‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये ‘चालता बोलता इतिहास’ या सदरात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही रमेशभाई मेहता यांची लेखमाला प्रकाशित झाली होती. लोटस पब्लिकेशन्सने या लेखमालेचे मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित केले असून याचा प्रकाशन सोहळा शनिवारी पार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. ‘संघ निरपेक्षपणे सेवाकार्य करीत असताना मी पाहिले. तरीही संघावर टीका केली जात होती. हा अन्याय आहे, असे मला वाटले. म्हणूनच दैनिक प्रत्यक्षमध्ये ही लेखमाला सुरू करण्यात आली. रमेशभाई मेहता यांनी मोठ्या प्रेमाने हे कार्य केले’, असे डॉ. अनिरुद्ध जोशी ह्या कार्यक्रमात म्हणाले.
‘भारतीय संस्कृतीचा र्हास होत असल्याचा आक्रोश केला जातो. पण भारतीय संस्कृतीची मुळे इतकी भक्कम व मूल्ये इतकी चिरंतन आहेत की तिचा कुणीही र्हास करू शकत नाही. कपडे, फॅशन बदलू शकते, पण त्यानुसार भारतीय संस्कृती बदलत नाही. बाह्य देखाव्याची भारतीय संस्कृतीला कधीही आवश्यकता भासली नाही. भारतीय संस्कृती प्रत्येक भारतीयांच्या मनात समानपणे प्रतिष्ठित आहे. म्हणूनच आक्रमणे झाली, संकटांचे पहाड कोसळले तरी भारतीय संस्कृती हे सारे पचवून पुन्हा उभी राहते. गणपतीच्या समोर आपण सारे शंकर, पांडुरंग, दुर्गेची आरती करतो. कारण हे सारे एकच आहेत, हे आपल्याला मान्य असते. त्यासाठी पुस्तके वाचावी लागत नाहीत, ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे’, याकडे डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लक्ष वेधले.
गोळवलकर गुरुजी व डॉ. हेडगेवार यांनी माता जगदंबा व भारतमातेमध्ये फरक केला नाही. गोळवलकर गुरुजींचे विचार संघासाठी केवळ मार्गदर्शक नाही तर ती संघासाठी घटना ठरते, असे सांगून डॉ. जोशी यांनी गोळवलकर गुरुजींच्या विचारानुसार संघाच्या शाखांना सर्वाधिक महत्त्व दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आज संघाच्या शाखा वाढविण्यावर भर दिला जातो त्याचप्रमाणे या शाखांची गुणात्मक वृद्धी करण्याला प्राधान्य दिले जावे, असे मत डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी मांडले.
‘विश्वातील अद्वितीय संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाची डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रत्येकाने आजच वाचावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. या प्रस्तावनेचे दोन परिच्छेद यावेळी राम नाईक यांनी वाचूनही दाखविले. तसेच रमेशभाई मेहता यांनी या पुस्तकात संघाच्या स्थापनेपासून ते १९९६ सालापर्यंतच्या कालखंडातील संघाचा प्रवास दिला आहे. पण यापुढचा संघाचा प्रवासही रमेशभाईंनी पुस्तकाच्या स्वरुपात वाचकांसमोर आणावा, असे आवाहन यावेळी राम नाईक यांनी केले. तर राज्यसभेचे खासदार व एस्सेल उद्योगसमुहाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांनी संघ म्हणजे या देशाचे संस्कार बनल्याचे सांगून कुठल्याही लाभ व सन्मानाच्या अपेक्षेने काम न करणार्या संघाच्या पदाधिकार्यांचे दाखले दिले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघाबद्दल समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविण्यात आल्याची खंत व्यक्त केली.
‘सामाजिक समता व समरसता, आर्थिक समता यांच्यासाठी कटिबद्ध असूनही संघाच्या समर्थकांविरोधात समाजात अपप्रचाराचे विष पसरविण्यात आले. हे गैरसमज म्हणजे संघासमोरील आव्हान असून ते दूर करण्यासाठी स्वयंसेवकांना आपल्या आचरणाद्वारे अधिक प्रयत्न करावे लागतील’, असे गडकरी म्हणाले. संघाचे सर्वच क्षेत्रात अफाट कार्य सुरू आहे. हे कार्य माध्यमांद्वारे समाजापर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. पण संघाच्या विचारापासून प्रेरणा घेऊन शिक्षण, आरोग्य, व्यक्तीनिर्माण यासाठी केल्या जाणार्या कार्याचे परिणाम नक्कीच समोर येत राहतील. ज्या प्रमाणात संघाचे कार्य पुढे जाईल, त्या प्रमाणात देशाचा गुणात्मक विकास होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी आपल्याला संघाचा इतिहास लिहिण्याची प्रेरणा दिली, असे यावेळी रमेशभाई मेहता म्हणाले. संघाचा इतिहास मांडण्याच्याही आधी आपण या पुस्तकात देशाचा इतिहास मांडला. आपला इतिहास निराश करणारा नाही, तर गौरवशाली आहे. असे असताना आपल्यासमोर परकीय आक्रमकांनी लिहिलेला इतिहास आणला जातो, अशी खंत यावेळी रमेशभाई मेहता यांनी व्यक्त केली. म्हणूनच खर्याखुर्या इतिहासाचा वारसा आपण पुढच्या पिढीच्या हाती सोपविला पाहिजे, असे रमेशभाई मेहता यावेळी म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण वैद्यकीय कारणांमुळे अनुपस्थित राहिलेल्या भैय्याजी जोशी यांचा शुभेच्छापर संदेशाचे डॉ. सतिश मोढ यांनी वाचन केले.